चाळीसगाव : फसव्या जाहिरातीद्वारे शेतकर्याची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी बीड जिल्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. अविनाश सुभाष सावंत (वय 26, रा.उपळी, ता.वडवणी, जि.बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अडीच लाखांच्या सोलर पंपावर 90 टक्के सबसीडी मिळेल व हा पंप 25 हजारांचा मिळेल, अशी जाहिरात करण्यात आल्यानंतर चाळीसागव तालुक्यातील शेतकरी त्यास बळी पडला. समृध्दी सोलर या नावाच्या बनावट खात्यामध्ये ऑनलाईन 65 हजार रुपये घेवून फसवणूक करण्यात आल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चाकण येथून केली अटक
ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीला चाकण, पुणे येथून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने लोकांच्या फसवणूकीच्या रकमेतून त्याचे नातेवाईक व मित्रांच्या नावे 1,50,000 रुपयांची एक चारचाकी गाडी व 1 हजार रुपये किंमतीचे दोन विवो कंपनीचे मोबाईल खरेदी केल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, युवराज नाईक, शांताराम सीताराम पवार, भूपेश वंजारी, अनिता सुरवाडे, मालती बच्छाव यांच्या पथकाने केली.