भुसावळ : भुसावळ उपविभागातील चारही पोलीस स्टेशनअंतर्गत आज (दि. २२) पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, कोर्टाकडून प्राप्त अटक वॉरंट, बेलेबल वॉरंट यांची बजावणी करण्यात आली. तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करणे, हॉटेल लॉजेस तपासणी करणे, त्याशिवाय तडीपार आरोपी तपासणे आदी विविध बाबींसाठी ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान खालील प्रमाणे कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेंतर्गत एकूण ७१ व्यक्तींना समन्स बजावण्यात आले. चारही पोलीस स्टेशन हद्दीमधील २५ व्यक्तींना बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. सात व्यक्तींना अटक वॉरंटची बजावणी करण्यात आली. शहरातील २४ हिस्ट्री सिटर्स अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्यात आले. एकूण चार दारूच्या रेड त्याचप्रमाणे दोन जुगार रेड करण्यात आल्या. भुसावळ शहरातील १२ हॉटेल लॉजेस चेक करण्यात आले.
४९ वाहनांवर कारवाई
भुसावळ शहरामध्ये गांधी पुतळा या ठिकाणी त्याचप्रमाणे नाहाटा चौफुली या ठिकाणी व भुसावळ तालुका हद्दीतील कुऱ्हा गावामध्ये पोलिसांकडून मोठी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदी दरम्यान सुमारे तीनशेच्या वर वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वाहनांवर मोटर वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ७वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
घरफोडीच्या गुन्ह्यातील २० आरोपी तपासले
घरफोडी, जबरी चोरी, चोरी यासारख्या गुन्ह्यातील २० आरोपी तपासण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चारही पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडघन, श्री गायकवाड, श्री शेंडे, एपीआय मोरे, एपीआय नाईक, एपीआय वानखेडे, एपीआय पवार, एपीआय भोये, पीएसआय पाथरवट यांनी व त्या त्या पोलीस स्टेशनच्या स्टाफने मिळून केलेली आहे.