मुंबई : भारतीय मानक ब्युरोने मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) BIS नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे एक कोटी पाच लाखांचे दागिने जप्त केले. राज्यात नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती बीआयएसला मिळाली. त्यावरून नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 2.75 किलोग्रॅम दागिने जप्त करण्यात आले.
हॉलमार्किंगच्या नियमांचे उल्लंघन
छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचा उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे बीआयएस चे लक्षात आले होते. त्यानंतर विशेष छापा आणि जप्ती मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
जुन्याच पध्दतीने दागिणे विक्री
नागपुरात इतवारीतील सराफा बाजारात एका ठिकाणी बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. त्या ठिकाणी वर्ष 2021 पासून बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करून जुन्याच पद्धतीने ग्राहकांना सोन्याचे दागिने विकले जात होते. मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारात दोन ठिकाणी, मुंबईतील अंधेरीमध्ये एका ठिकाणी, ठाण्यात जांभळी नाक्याजवळ एका ठिकाणी तर पुण्यात रविवार पेठेतील एका ज्वेलर्सवर ही अशीच कारवाई करण्यात आली आहे.