जळगाव : जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका तरुणाने व्हॉट्सॲपवर स्वत:चेच श्रध्दांजली स्टेटस ठेऊन गळफास घेत आत्महत्या केली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
नेरी बुद्रुक येथे ऋषीकेश आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याने पहिल्या दिवशी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मूड ऑफ असे स्टेटस ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने त्याचा चुलत भाऊ प्रदीप खोडपेला फोन केला. “मी तुला सोडून जात आहे”. असं तो फोनवर म्हणाला. भाऊ प्रदीपने ऋषिकेशला विचारले “तू कुठे आहे”. तर त्याने सांगितले, “मी गोरख बाबांच्या शेतात आहे”.
गावात शोककळा पसरली
त्यानंतर त्या ठिकाणी गेले असता त्यांना ऋषिकेश हा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. जामनेर पोलिसांनी ऋषिकेश यास खाली उतरवून जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऋषिकेश यास मयत घोषित केले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. कुठल्यातरी कारणामुळे ऋषिकेश नैराश्यात गेला असावा व त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करत आहेत.