मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. परदेशी नागरिकांच्या वृत्तीमध्ये एक पुस्तक सापडले, या पुस्तकाला उघडून पाहताच अधिकाऱ्यांना मोठा धक्काच बसला. या प्रवाशाने पुस्तकांच्या पानांमध्ये अमेरिकन डॉलर लपवून आणले होते. यासोबतच त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपात 2.5 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय पुस्तकात लपवून भारतात आणलेले तब्बल 90 हजार अमेरिकी डॉलर पकडले आहेत. त्याची भारतीय चलनातील किंमत 81 लाख रुपये इतकी आहे.
बेकायदेशीररित्या विदेशी चलन आणले
कस्टम विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, भारतात येणाऱ्या एका परदेशी नागरिकाकडे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार संशयास्पद व्यक्तींची चौकशी अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी या व्यक्तीकडे दोन पुस्तकांच्या पानांमध्ये त्याने अमेरिकी डॉलरच्या नोटा लपविल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.