जामनेर : आठ राज्यात ११ हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क करून ३ हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनरीकडून बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. त्या सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित असल्याचे संत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले. धर्म सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अ. भा.हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाची जामनेर तालुक्यातील गोद्री येथे आज २५ जानेवारी पासून सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर पोहरागड येथील गादीपती संत बाबूंसिंग महाराज, अ. भा. धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले, महामंडलेश्वर गुरू शरणानंद महाराज, संत गोपाल चैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, संत देनाभगतजी महाराज, संत यशवंत महाराज, संत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य साहेबराव शास्त्री, महंत संग्रामसिंग महाराज, संत रायसिंग महाराज आदी संत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मंचावर असलेल्या श्री बालाजी भगवान, गुरुनानक देवजी साहेब, भारत माता आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
३ हजार तांड्यांचे धर्मांतरण…
यावेळी अ.भा. धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले यांनी मार्गदर्शन करतांना देशाचे वैभव पाहून परकीय आक्रमणे झाली. ज्या ग्रीकांनी आक्रमण केले होते ते हिंदू झाले. इस्लामचे आक्रमण वेगळे होते. ते क्रूर होते तलवारीच्या जोरावर लाखो लोकांचे धर्मांतरण त्यांनी केले. इसाई द्वारा छल, कपट आणि सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण सुरु झाले. हे धर्मांतरण पूजा पद्धती पुरते मर्यादित न राहता वेगळे राज्य आणि वेगळा देशाच्या मागणीने सुरु झाले. पूर्वांचल मध्ये ७ पैकी ४ राज्यांमध्ये ख्रिस्तीकरण झाले. ११ हजार बंजारा तांड्यापैकी ३ हजार तांड्यांचे धर्मांतरण झाले आहे. बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे त्यांनी सांगतिले. बंजारा समाजाच्या कुंभात मथुरेहून संत उपस्थित राहिले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यातील समाज आणि संत कुंभात सहभागी झाले आहेत.