धुळे : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ जळगावहून विक्रीसाठी आलेला रेशनिंगचा तांदुळ जप्त करण्यात आलाय. संशयितांमध्ये मंगरुळसह भुसावळचा व्यापारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील लाभार्थीना अंत्योदय योजनेतून हा तांदुळ वाटप होणार होता. तो धुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील तिघांवर आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी बाजार समितीजवळ रेशनचा तांदूळ असल्याने हा ट्रक (एमएच-१७-बीडी- ९२८२) पकडला. ट्रकमध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ५५० गोण्या होत्या. या प्रकरणी वाहन मालक महेफुज रहमान मोहंमद इस्माईल याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने रवींद्र बळीराम पाटील (रा. मंगरुळ, ता. अमळनेर), बिरदीचंद अमरचंद लाहोटी (रा. भुसावळ) यांचे नावे सांगितले.
१० लाख ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त
रवींद्र पाटील व बिरदीचंद लाहोटी यांनी रेशनचा तांदूळ खरेदी केला. त्यानंतर काळ्याबाजारात विक्रीसाठी आणला. कारवाईत १० लाखांचा ट्रक व ७६ हजार ३५० रुपयांचा तांदूळ जप्त केला. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक मायानंद अनंत भामरे (वय ५२) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, रेशनचा तांदूळ नेमका कुठून आणला आहे. याचा शोध घेतला जाणार आहे. तो जळगाव जिल्हयातील असल्याचा संशय आहे. तसे असल्यास प्रशासनाशी संपर्क साधुन माहिती दिली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.