मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख सहा मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन करणार असल्याची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केली आहे.
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनसुद्धा शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने, विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
काय आहेत मागण्या?
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, आश्वासित प्रगती योजनायासह विविध मागण्यांसाठी संप करण्यात येणार आहे.
परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार
राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीने आयोजित केलेल्या 6 जानेवारीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार,या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून या आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय झालेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून आणि सरकारकडून या संपाबाबत काय तोडगा काढला जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.