मुंबई : महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.
ऑनलाईन प्रिट काढून मिळणार
फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसंच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठीकोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे.
हॉल तिकिट्समध्ये अशी करा दुरुस्ती
प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असंही सांगण्यात आलं आहे.