धुळे : एटीएम कार्डची अदलाबदली करून मजुरांना लाखो रुपयांच्या गंडा घालणाऱ्या टोळक्याला सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्यावर मुंबई आणि परिसरातून तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.
या गुन्ह्या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षण हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंबई पासिंग असणाऱ्या एका कारमध्ये टोळके संचयितरित्या परिसरात टेहळणी करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील तसेच संदीप पाटील, संतोष पाटील, जयेश मोरे, इस्रार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा यांना दहिवद गावाकडे रवाना करून या टोळक्याचा शोध घेण्याचे आदेश दिले.
94 एटीएम कार्ड जप्त
पोलिसांच्या पथकाने एक स्विफ्ट डिझायर गाडी अडवून यातील चौघांची विचारपूस सुरू केली. या गाडीमध्ये कल्याण येथे राहणारा विकी राजू वानखेडे, उल्हासनगर येथे राहणारा अनिल कडोबा वेलदोडे, वालधुनी येथे राहणारा वैभव आत्माराम महाडिक तसेच उल्हासनगर येथील विकी पंडित साळवे या चौघांना ताब्यात घेतले. या चौघांची आणि गाडीची तपासणी केली असता वेगवेगळ्या बँकेचे 94 एटीएम कार्ड आढळून आले आहे. त्याचबरोबर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल देखील आढळून आले. या टोळक्याने जळगाव जिल्ह्यातील भडगाव तसेच भिवंडी, पिंपरी चिंचवड, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पेल्हार अशा परिसरामध्ये चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे.