चाळीसगाव (प्रतिनिधी) : पशुधनाची अवैध वाहतूक करणारी मिनी ट्रक अडवून त्यातील बारा गायींची सुटका करण्यात आली. यानंतर संतप्त जमावाने हे वाहन पेटवून दिल्याची घटना गुरुवारी रात्री चाळीसगाव नांदगाव रस्त्यावरील खडकी बुद्रुक नजीक घडली. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
जमावाने रस्त्यावर पाळत ठेवून वाहन अडविले
नांदगाव येथून चाळीसगावकडे जाणाऱ्या (क्र. एमएच १५ सीके ५७४०) या मिनी ट्रकमधून पशुधन निर्दयीपणे बांधून नेले जात आहे, अशी माहिती गावातील काही नागरिकांना मिळताच जमावाने लागलीच रस्त्यावर पाळत ठेवून हे वाहन अडविले. त्यानंतर वाहनातील गायींची सुटका केली. त्यानंतर हे वाहन पेटवून दिले. या घटनेने भयभीत झालेला वाहनचालक तेथून पसार झाला.
एका गायीचा मृत्यु
दरम्यान, वाहनात कोंबलेल्या १२ गायींपैकी एका गायीचा मृत्यु झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गायींची बेलदारवाडीच्या गोशाळेत रवानगी केली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव !
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस नाईक अमित बाविस्कर, भटू पाटील, मुकेश पाटील, भूषण पाटील, राहूल सोनवणे, कॉन्स्टेबल उज्ज्वला म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर बोलेरो जळत असताना त्यांना दिसली. या ठिकाणी वाहनातून उतरवलेली गुरे होती. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन बंबाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.
गायींची रवानगी गोशाळेत
वाहनातील १२ गायींपैकी एका गायीचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुटका झालेल्या ११ गायींची बेलदारवाडी येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.