मुंबई : राज्यातील परभणीसह चंद्रपूर, अकोला, नागपूर, हिंगोलीमध्ये आकाशात उडती तबकडी दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. आकाशात उडणारी ही रहस्यमयी वस्तू नेमकी आहे तरी काय? याबद्दल लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.
अवकाशात चमकणारी आयताकृती अज्ञात वस्तू दिसल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला. गुरुवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास सर्वत्र आकाशातून एक लांब वस्तू वेगाने प्रवास करताना दिसली. या वस्तूवर चमचमणाऱ्या ताऱ्यासारखी वस्तू दिसत होती. आकाशातून पाच गोळे एकाच रांगेतून जाताना नागरिकांनी बघितले. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी देखील हे दृश्य पाहायला मिळाले आहे. या अज्ञात वस्तूने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकार?
चंद्रपूरमध्येही संध्याकाळी 7.20 वाजेच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलोन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे. भक्कम इंटरनेट जोडणीसाठी अवकाशात अशा प्रकारच्या 55 सॅटेलाईटची एक ट्रेन सोडण्यात आली असून तीच चंद्रपूरच्या आकाशात दिसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले. आकाशात अशा प्रकारे ही स्कायट्रेन भविष्यात अनेकदा दिसू शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्कायलिंक आहे तरी काय?
स्कायलिंक हे स्पेसएक्स द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहांचा समूह आहे. जो 47 देशांना उपग्रह इंटरनेट कव्हरेज प्रदान करतो. त्याचे यावर्षी नंतर जागतिक मोबाईल सेवेचे उद्दिष्ट आहे. स्पेसएक्स ही एलन मस्क यांची खाजगी इंटरनेट कंपनी आहे. संस्थेने 2019 मध्ये स्कायलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2022 पर्यंत स्कायलिंकमध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3300 पेक्षा जास्त वस्तुमान निर्मित लहान उपग्रहांचा समावेश आहे. स्कायलिंक उपग्रह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दिसल्याने नागरिकांत विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.