जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचा बदलीचा आदेश रद्द ठरवून आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती करावी, असा आदेश ‘मॅट’ने दिला होता. आदेशामुळे शासनाला चपराकच बसली आहे. यानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने डॉ. विद्या गायकवाड यांना पुन्हा नियुक्तीपत्र दिले आहे.
जळगाव महापालिकेत २९ नोव्हेंबर २०२२ ला महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश आले. त्यांच्या पदावर परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आदेशानुसार श्री. पवार यांनी जळगावला येऊन पदभार स्वीकारला. त्यावेळी डॉ. गायकवाड पुण्याला प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या नियुक्तीला केवळ सहा महिने झाले होते. तसेच बदलीचे कोणतेही कारण नसताना ही अचानक बदली का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करून त्यानी ‘मॅट’मध्ये अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्यासमोर याचे कामकाज झाले.
‘मॅट’ने बदलीला स्थगिती दिली
‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते. ‘मॅट’मध्ये तब्बल दोन महिने सुनावणी चालली. अखेर मंगळवारी (ता. ३१) निकाल लागला. त्यात डॉ. गायकवाड यांना दिलासा मिळाला. त्यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती करावी व देविदास पवार यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता नगरविकास विभागाने नियुक्ती पत्र दिले असून, पदभार घेण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रावर शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांची स्वाक्षरी आहे.