मुंबई : अमेरिकन संस्था हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल (एम-कॅप) दररोज घसरणाऱ्या शेअर्समुळे सातत्याने घटत आहे. यामुळे अदानी समूहाने गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये 9 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप गमावले आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे बाजार भांडवल 10 लाख कोटींनी कमी झाले आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाचे मार्केट कॅप 19.2 लाख कोटी रुपये होते. अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट्स, एसीसी आणि एनडीटीव्ही यांच्यासह अदानी समूहाचे एकूण 10 शेअर शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर हे शेअर्स 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
या शेअर्समध्ये झाली घसरण
या कालावधीत अदानी टोटल गॅसचे शेअर्स सर्वाधिक 51 टक्क्यांनी घसरून 3,885.45 रुपयांवरून 1,901.65 रुपयांवर आले. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 40 टक्के घसरण झाली आहे. तर अदानी एंटरप्रायझेस 38 टक्के, अदानी ट्रान्समिशन 37 टक्के, अदानी पोर्ट्स आणि SEZ 35 टक्के, अंबुजा सिमेंट्स 33 टक्के, अदानी विल्मार 23 टक्के, अदानी पॉवर 22.5 टक्के, ACC 21 टक्के आणि NDTV च्या शेअर्समध्ये 17 टक्के घसरण झाली आहे.
अमेरिकेकडून झटका
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात 35 टक्क्यांपर्यंत घसरले, असे S&P डाऊ जोन्स निर्देशांकाने सांगितले. हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहाबाबत स्टॉक मॅनिपुलेशन-अकाउंटिंग फ्रॉडसह विविध दावे करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांबाबत, डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सने मीडिया स्टेकहोल्डरच्या विश्लेषणानंतर कारवाई करताना अदानीची कंपनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, ते 7 फेब्रुवारी रोजी डाऊ जोन्समधून काढले जाईल.
हिंडेनबर्ग दावा
हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी रोजी आला. तेव्हापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीचा काळ सुरू झाला. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहाच्या सूचिबद्ध सात कंपन्या ओव्हरव्हॅल्यूड असल्याचा दावा केला आहे. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि मनी लाँड्रिंगमध्ये गुंतला आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गवर कॉपी-पेस्टिंगचा आरोप केला होता. एकतर हिंडेनबर्गने योग्य संशोधन केले नाही किंवा जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी चुकीची तथ्ये मांडली होती, असे या अदानी समूहाने म्हटले होते. 400 हून अधिक पानांच्या प्रतिक्रियेत गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने सर्व आरोपांना दिशाभूल करणारे म्हटले आहे.