जळगाव : जळगाव शहरात वाळूची चोरटी वाहतूक सुरु आहे. याविरुध्द पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बांभोरी ते जळगाव दरम्यान महामार्गावरुन वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाई प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुका पोलिसांनी बांभोरी ते जळगाव शहरादरम्यान विना क्रमाकांच्या ट्रॅक्टवर कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस नाईक हरिश शिंपी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई महामार्गावर हॉटेल साई पॅलेससमोर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली असून विना क्रमाकांच्या ट्रॅक्टवरवरील अज्ञात चालकाविरोधात पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
वाळू माफियांमध्ये खळबळ
या परिसरात हॉटेल मराठा समोर पोलिसांनी कारवाई करुन आणखी एक ट्रॅक्टर पकडले, वाळूसह विना क्रमाकांची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली असून तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. खोटेनगर स्टॉपजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विना क्रमाकांच्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी सुध्दा तालुका पोलिसात अज्ञात चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांच्या या धडक कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.