मुंबई : मुंबईतील एका शेअर ट्रेडींग एजन्सीमध्ये नागपूरच्या व्यावसायिकांनी गुंतवणूक केली होती. मात्र, एजन्सीच्या संचालकांनी शेअर्सची परस्पर विक्री करुन तब्बल 20 कोटी 90 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात शेअर मार्केट एजन्सीच्यी तिघा संचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूरचे रहिवासी असलेले अभिनव रमाकांत फतेहपुरीया (वय 40) यांची मे. सिल्व्हरस्टोन इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी आहे. अभिनव यांच्या कंपनीला तसेच त्यांचे मित्र राहुल आणि राजकुमार अगरवाल यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची होती. त्यांनी विलेपार्ले येथील जे. एन. एमरियाल्टी या शेअर ट्रेडिंग एजन्सीचे संचालक जस्मीन शाह यांच्याशी संपर्क साधला.
तिघांविरुध्द गुन्हा दाखल
शाह यांनी चांगली गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तिघांनी 20 कोटी 90 लाख रुपये शहा यांच्या खात्यावर वर्ग केले. त्यांनतर शहा यांनी 75 लाख 50 हजार शेअर्स विकत घेतल्याचा व्हॉट्सॲप मेसेज केला. मात्र, शहा यांनी या शेअर्सची परस्पर विक्री केली. ही बाब अभिनव यांच्या लक्षात आली असता, त्यांनी पोलिसात तक्रार दिली. याबाबत जुहू पोलिसांनी जस्मीन शहा, दीपिका जस्मीन शहा आणि विशाल शहाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.