छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर अमेरिकेत एका उद्यानात समोर आला आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस शहरातील उद्यानात ही घटना घडली. येथील गुआदाल्युप रिव्हर पार्कमधून हा पुतळा चोरीला गेला आहे. या भागातून हा पुतळा गायब झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने ट्विटद्वारे दिली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरु केल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅन जोस पार्क विभागाकडून ट्वीटरद्वारे याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. याबाबत माहिती सांगताना आम्हाला वाईट वाटत असल्याचे ते म्हणाले आहेत मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.
रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी
या घटनेची माहिती समोर येताच त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन जोस शहराला शिवाजी महाराजांचा पुतळा दिला. हा पुतळा सॅन जोस शहरातील उद्यानात बसवण्यात आलेला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे. याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी, ही विनंती.