जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात श्री सिद्धी महागणपती भव्य असं देवस्थान उभारण्यात येत आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त या ठिकाणी 100 टन वजनाची 31 फूट उंच असलेली देशातील सर्वात उंच गणपती बाप्पाच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या महागणपतीच्या मूर्तीमध्ये गणपती रिद्धीसिद्धी सहित आहे. उजव्या सोंडत अमृतकुंभ, पोटावर नाग आणि कपाळावर घंटा आहे. 374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणातून 31 फुट उंच 100 टन वजनाची मूर्ती घडविण्यात आली आहे. दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी हा दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला आहे.
15 फुटाच्या रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती
तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत. आजूबाजूला रिद्धी-सिद्धी असलेले आणि तर श्री गणरायाच्या सोंडेत अमृत कुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायांचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात.
पाच हजार वर्ष मुर्तीचे आयुष्यमान
ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईतून क्रेन मागवण्यात आली. आधी मूर्ती ठेवण्यात आली, त्यानंतर आता मंदिर साकारण्यात आले. 5 हजार वर्षांपेक्षा जास्त मूर्तीचे आयुष्य असून, 6 फुटाचा बैठकी मूषकराज आहे.