पुणे : शाळेत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
भीमा नदीवरील हुतात्मा राजगुरू पुलाजवळ हे हुतात्मा राजगुरू विद्यालय आहे. विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या 215 मुलांना तीन पातेल्यांतून पोषण आहार दिला जातो. गुरुवारी दुपारी 1 वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहारातील मसालेभात वाढण्यात आला. त्यातील एका पातेल्यातील भाताची साबणासारखी चव लागत होती. मुलांना पोटदुखीचा आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्याध्यापक अशोक नगरकर यांनी दिली.
शाळा प्रशासनाविरुद्ध पालकांचा आक्षेप
या घटनेची माहिती पालकांना समजताच पालकांनी थेट रुग्णालयात मुलांना पाहण्यासाठी धाव घेतली. रुग्णालयात पालकांनी शाळा प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. या घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी दाखल झाले असून नेमका हा विषबाधा कसा झाला? याबाबत चौकशी सुरू केली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.