चाळीसगाव – तालुक्यातील चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील बहाळ येथे मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले आहे. एक महिन्यात एकूण15 जनावरे या बिबट्याने फस्त केले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. या बिबट्यास जेरबंद करण्याची ग्रामस्थांची अनेक दिवसापासून मागणी होती.
वनविभागाने या ठिकाणी दोन पिंजरे बसवले होते. तसेच या बिबट्याच्या हालचाली ओळखण्यासाठी पाच ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून हा बिबट्या हे क्षेत्र सोडून निघून जावा यासाठी जागोजागी फटाके फोडण्यात आले होते. आज अखेर शेतकरी प्रभाकर नागो शेवरे यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.
यांच्या पथकाने केली कारवाई
या बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संदीप भट यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही कार्यवाही वनसंरक्षक दि. वा. पगार, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहा. वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, विवेक देसाई, राजेश ठोंबरे, वनपाल आर. व्ही. चौरे, जी. एस. पिंजारी, वनरक्षक चंद्रशेखर पाटील, अश्विनी ठाकरे, राहुल पाटील, काळू पवार, महेंद्र शिंदे, रवी पवार, संजय चव्हाण, दिनेश कुलकर्णी, राहुल मांडोळे, ज्ञानेश्वर पाटील, जुगराज गढरी, अशोक पाटील, सिद्धार्थ वाघ, बाळू शितोळे, भटू अहिरे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.