मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर खळबळजनक खुलासा समोर आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. मुंबईतील १० बार मालकांनी अनिल देशमुख यांना सलग तीन महिने ४ कोटी रुपये दिले होते, अशी गोपनीय माहिती सक्तवसुली संचालनालयाला मिळाली असून अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील बार मालकांकडून अनिल देशमुख यांनी ४ कोटी रुपये एवढी रक्कम घेतल्याचा पुरावा ईडीच्या हाती लागला असून या आधारावर देशमुख यांच्या घरावर छापे टाकले गेले आहेत. अनिल देशमुख यांच्या सोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि खाजगी सचिव संजीव पालांडे यांच्या घरावरही ईडी कडून छापा टाकला गेला आहे.
याआधी पोलीस अधिकाऱ्यांना शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर असताना याबाबत सीबीआय चौकशी चालू आहे. या माध्यमातून सक्तवसुली संचालनालयाला ही गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे. मुंबई पोलिसात निलंबित करण्यात आलेल्या सचिन वाझेंवर मुंबईतील बार मालकांकडून लाखो रुपये वसूल केल्याचा आरोप आहे.