जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील प्रभाग क्र १६ मधील देविदास कॉलनी परिसरात अमृत योजना आणि भुयारी गटारीचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे, संतप्त नागरिकांनी योजनेच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः आरती उतरवली आहे. या प्रकाराने नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये बराच काळ शाब्दिक चकमक व शिवीगाळ झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती नुसार आज प्रभाग क्र. १६ मध्ये देविदास कॉलनी परिसरात अमृत व भुयारी गटारीचे काम झाले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम अर्धवट सोडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून, परिसरात खराब रस्त्यावरून खड्ड्यात पडल्याच्या घटना दररोज घडत आहे. आज नगरसेवक कुंदन काळे, प्रकाश बालाणी यांनी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलावले असता, नागरिकांनी संताप व आक्रोश व्यक्त केला. यावेळी संतप्त नागरिकांनी अमृत योजनेमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा व निकृष्ट दर्जाचे काम दाखवून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांनी अधिकाऱ्यांना शिवाची लाखोली वाहिली. नगरसेवक वार्डातील काम पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नागरिकांनी यावेळी अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घालून त्यांची आरती उतरविली.