जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | खान्देशचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपा मधून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, परंतु अद्यापही त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले नसल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजपाला मोठे भगदाड पाडून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु पक्षाने अद्यापही त्यांना आमदारकी किंवा मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त कोट्या ऐवजी पर्यायी मार्ग अवलंबून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेत पाठवले, तर भारतीय जनता पार्टी पुढे खूप मोठे आव्हान उभे राहू शकते, असे राजकीय नेत्यांचे मत आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो, असा कयास देखील लावला जात आहे. त्यामुळे खडसे हे विधान परिषदेत जाणे आणि त्यानंतर मंत्री होणे गरजेचे आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांची राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी निवड देखील केली आहे. परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या कोट्यातून नियुक्त आमदारांच्या प्रकरणाला सध्या थंडबस्त्यात ठेवले आहे. यामुळे खडसे यांची कुठे नियुक्ती होते, याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे. संभाव्य मंत्रीपद देखील अद्याप दूर असल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय अशी मिळून महाविकास आघाडी सत्तेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आणि सत्तेचे कोणतेही निर्णय घेण्यास सक्षम असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले आहे. त्याचे कारण महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात खासदार सुप्रिया सुळे यांना पुढे आणून भविष्यात मुख्यमंत्री करण्याचा शरद पवार यांचा राजकीय बेत असल्याचे बोलले जात आहे. जर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाआघाडीच्या विरोधात केंद्रातील सत्तेच्या जीवावर भाजपा त्यांना सतत कोंडीत पकडत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रिमंडळाने राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी बारा जणांची यादी देऊन राज्यपाल कोश्यारी यांनी त्या नावांना आपल्या अधिकारात संमती न दिल्यामुळे या घोषित उमेदवारांना आमदारकी पासून लांब राहावे लागत आहे. या यादीमध्ये एकनाथ खडसे यांचे नावदेखील आघाडीवर आहे. परंतु आमदार निवडीला वेळ लागत असल्यामुळे राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्याकडे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी दुर्लक्ष करू नये अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कारण एकनाथ खडसे यांनी राज्यात भाजपाची सत्ता असताना अनेक महत्त्वाची खाती सांभाळली असून त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. तेरा खात्यांचा कारभार पाहणारे ते एकमेव मंत्री होते, हे देखील उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकारणातील पावरफुल मानले जातात. ते एक सक्षम नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अधिक जोमाने वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. परंतु सध्या खानदेशात राष्ट्रवादीची असलेली परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्याची गरज असतांना, त्यांचे पुनर्वसन लवकर व्हावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.