मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, पाच सदस्यीय खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र, यातच आता शिवसेना पक्षाचा निधी, शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना भवन शिवसेना शिंदे गटाला द्यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता. यानंतर आता सेना भवन, पक्षाचा निधी आणि पक्षाच्या शाखा शिंदे गटाला देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असा दावा शिंदे गटाने केला होता. यानंतर आता ही याचिका दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
कुणी केली सर्वोच्च न्यायालयात याचिका?
वकील आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा, अशी मागणी आशिष गिरी यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या २४ तारखेला सुनावणी करण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली आहे. मात्र, न्यायालयाने यावर काही स्पष्टीकरण दिलेले नाही.
याचिकेत आशिष गिरी यांनी काय म्हटलेय?
शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तर, सर्वोच्च न्यायालयानेही यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते बनले आहेत. यामुळे शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावा. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. आशिष गिरी यांनी कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२४ एप्रिलला सुनावणी होणार
दरम्यान, ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या २४ एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती. या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की, या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.