मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं ट्वीट केल्याने खळबळ उडाली होती. यावरून रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना मोठी ऑफर दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. पवारसाहेबांनी त्यांना अनेक पदं दिली आहेत. मध्यंतरी अजित पवार आजारी होते म्हणून नॅाट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपात जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत, म्हणून त्यांनी एकदा पहाटे शपथ घेतली होती. पण आता तसं होणार नाही. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल. आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं आहे.
एकनाथ शिंदे रडणार नाहीत
आठवलेंनी आदित्य ठाकरे यांनी भाजपाबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांवर बोलताना सांगितले की, एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. ते रडणार नाहीत. आदित्य ठाकरेंचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. आपल्या कवितेच्या शैलीत टीका करताना पुढे त्यांनी म्हटलं की, ते रडले म्हणून उद्धव ठाकरे पडले.