जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ओबीसी आरक्षण पूर्ववत करुन न दिल्यास राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता या घोषणेनंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करतांना दिसून येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला देत एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस वारंवार अशा घोषणा करतात. खडसेंनी पुराणाचे उदाहरण देत म्हटले की, वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात ही पाहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले होते. तसा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असेही सांगितले होते. पण पहाटे शपथ घेतली. आता ते सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात, सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असे वाटते, असं एकनाथ खडसे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती. जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना माहिती होते. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल. पण केंद्राकडून डाटा मिळू द्यायचा नाही, आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांची आहे, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला.