जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आज भुसावळात आगमन झाले. येथील रेल्वे स्थानकावर ते आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ते बऱ्हाणपूरकडे रवाना झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे रविवारी पहाटे साडेसहा वाजता नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर प्रचंड बंदोबस्तात ते मुक्ताईनगरमार्गे बऱ्हाणपूरकडे रवाना झाले. भागवत यांच्या आगमनप्रसंगी स्थानिक पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त राखला होता शिवाय शनिवारी बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेण्यात आली होती.
पोलिसांचा फौजफाटा
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकापासून बऱ्हाणपूरपर्यंत सुरक्षा पुरवण्यात आली. यावेळी गांधी पुतळा, वाय पॉईंटपासून पुढे टप्प्या-टप्प्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. बऱ्हाणपूर येथे आयोजित तीन दिवस कार्यक्रमाला भागवत सहभागी होणार आहेत. भला मोठा ताफा आणि पोलिसांच्या गाड्यांसह ते लागलीच बऱ्हाणपूर येथे रवाना झाले.
बऱ्हाणपूर येथे कार्यक्रम
बऱ्हाणपूर येथे मोहन भागवत हे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने ते रेवा गुर्जर भवनात आयोजीत करण्यात आलेल्या धर्म संस्कृती सभेत सहभागी होणार आहेत. तर डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत उद्या बऱ्हाणपूर येथे डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या समर्थ भवनाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे.