मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. तर उपचारधीन असलेल्यांचा खर्च सरकार करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्यातील अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह सुमारे 3 लाख लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात अमित शहा यांनी समाजसेवक दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना पुरस्काराने सन्मानित केले.
सरकारवर होतेय टीका
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये आठ महिला असून बहुतांश वृद्ध आहेत. हृदयविकाराच्या समस्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काही रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सोहळ्याच्या नियोजनातील अक्षम्य त्रुटी आणि ढिसाळ कारभाराच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे.
इतक्या लोकांचे मृत्यू कसे झाले?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला राज्यभरातून तब्बल 25 लाख भाविक जमले होते. मात्र, येथील नियोजन अत्यंत ढिसाळ होते. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहिला. त्यामुळे सामान्य अनुयायांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. पाण्याचे टँकर्स मैदानापासून दूर ठेवण्यात आले होते. बरेच अनुयायी शनिवारी रात्रीच नवी मुंबईत दाखल झाले होते. कार्यक्रम संपेपर्यंत हे अनुयायी उपाशीच राहिले. अशातच बराच काळ पाणी न मिळाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी उष्माघाताचा परिणाम जास्त झाला. कार्यक्रम संपताच 25 लाखांची गर्दी एकत्र मैदानाबाहेर पडली. त्यामुळे उष्माघातामुळे बेशुद्ध पडलेल्या अनुयायांना रुग्णालयात घेऊन चाललेल्या रुग्णवाहिकांचा रस्ता अडला. परिणामी अनुयायांना वेळेत उपचार मिळण्यात अडचण आली. या सगळ्यामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे.