जळगाव : अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून राजकीय भूकंपच नाही तर महाभूकंप होणार, असा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण सुरू आहे. भाजप शिवसेनेच्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होईल. आणि अजित पवार यांच्या पक्षांतराच्या नुसत्या चर्चा नसून या सर्व चर्चांमध्ये तथ्य असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. अजित दादा हा दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. राज्यात सध्या जोरदार विकास सुरू आहे. त्यामुळे अजित पवार हे विकासाच्या बाजूने असतील. शिवसेना भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आणि आमदारांचा गट आल्यास आगामी काळात राज्यातील चित्र वेगळं असेल, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं
शरद पवार जरी म्हणत असले या नुसत्या चर्चा आहेत. मात्र, शरद पवार यांच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवतं? शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं, असं म्हणतात. मी शरद पवार यांच्यावर टीका करणार नाही, कारण ते मोठे नेते आहेत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला आहे.
अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार
राज्यात ४० चा आकडा लकी आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असतील असे संकेतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात. त्यावेळी काही ना काही आखलेलं असतं. अजित पवार यांचं पक्षांतर अटळ आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितलं.