पुणे : राज्यात कारागृह विभागात तब्बल 2 हजार पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली ही 2 हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
महाराष्ट्र कारागृह विभाग तर्फे ‘ मायक्रो आन्मनेड एरियल वेहिकल’ या उपकरणाच्या प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य कारागृह विभागच्या कारागृह उपमहानिरीक्षक अधिकारी स्वाती साठे, अतिरिक्त अधीक्षक सुनील ढमाळ उपस्थित होते.
वर्षभरात विविध आजारांनी 120 कैद्यांचा मृत्यू
सध्या राज्य कारगृह विभागात तब्बल 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी दोन हजार पदे ही रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी 2 हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे, असे गुप्ता म्हणाले. कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. वर्षभरात विविध आजारांनी 120 कैद्यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ड्रोनद्वारे सुरक्षा ठेवणार
गुप्ता म्हणाले, पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील 12 कारागृहात ड्रोन लावण्यात येणार असून सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्याचा वापर करण्याबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.