जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज महापालिके समोर उपोषणास बसलेल्या दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना भेट दिली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांना बसण्यासाठी महापालिकेतून खुर्च्या मागविल्याने एकच चर्चा सुरू झाली.
एकनाथ खडसे जळगाव पालिकेजवळ येणार म्हणून कार्यकर्त्यांची व काही पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. या धावपळीनंतर काही कार्यकर्त्यांनी पालिकेत जाऊन खुर्च्यांवर कब्जा मिळविला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या खुर्च्या उचलून मंडपात आणल्या. एकेकाळी संपूर्ण राज्य गाजवणारे तसेच तेरा खाती सांभाळणारे नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीला आणि समस्या ऐकून घेण्यासाठी येत असल्याचे वृत्त कळताच कार्यकर्ते आणि उपोषण कर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. खडसे यांना बसण्यासाठी पालिकेतून खुर्च्या मागविण्यात आल्या हा विषय दिवसभर चर्चेचा ठरला असून याविषयी राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एकनाथ खडसे यांनी शिवाजीनगरच्या उड्डाण पुलासंदर्भात असलेली अडचण व समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या कामकाजाबद्दल व शिवाजीनगरच्या पुलासंदर्भात संथगतीने सुरू असलेले काम याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पालिकेच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले. कासवगतीने उड्डाणपुलाचे काम सुरू असून वेळीच महापालिकेने ५० लाख रुपये भरले नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पुलाच्या कामाच्या वाढत्या किमती झाल्या असून, हे काम जलद गतीने होणे अपेक्षित असताना मात्र काही नगरसेवक आपल्याला यात काही टक्केवारी मिळते का याची प्रतीक्षा करीत बसले असल्याने हा कामाचा खोळंबा निर्माण झाला आहे असे सांगत खडसे यांनी याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
महापालिकेत सध्या सत्तांतर झाल्यानंतर बंडखोर भाजप नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू असून लवकरच अपात्रते संदर्भात निकाल लागल्यानंतर सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.