पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिदषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याने वातावरण बिघडले आहे.
विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या. या घटनेमुळे एकच गदारोळ पहायला मिळाला.
कारवाई करण्याची मागणी
पुणे विद्यापीठात आज विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू होती. कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता तोडफोड करण्यास सुरुवात केली. विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण चित्रीकरण करण्यास परवानगी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी यावेळी केली.
रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली
अभाविपच्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.