मुंबई: सामनाच्या अग्रलेखातू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावण्यात आला आहे. “भर मंडपात ‘वरमाला’, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले, त्या धक्क्यातून ते अद्यापि सावरलेले दिसत नाहीत” असे सामनात म्हटले आहे. तसेच “सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की” असा दावा देखील सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले की “भर मंडपात ‘वरमाला’, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले, त्या धक्क्यातून ते अद्यापि सावरलेले दिसत नाहीत. त्यात आता मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे-पाटलांचे नाव तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे.”
सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार
मिंधे गट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात दंग आहे, तर फडणवीस गट वरून गोडबोलेपणाचा आव आणत पाठीमागून वेगळाच ताव मारीत आहे. ते काही असो. सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पाहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ व अराजक कधीच माजले नव्हते.
शिंदे-मिंधे गटाचे कपडेच उतरवले
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले की, “राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही, पण राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत की नाही? असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्रीपद रिकामे नाही हे खरे, पण रिकामपणाचे उद्योग जोर धरू लागले आहेत. एका कार्यक्रमात अजित पवार आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कधीपासून मुख्यमंत्री व्हायचे आहे. विखेंना पवारांच्या वक्तव्यांविषयी विचारले तेव्हा त्यांनी आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! असे सांगून शिंदे-मिंधे गटाचे कपडेच उतरवले. म्हणजे सध्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण मोजत नसल्याचेच त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
धक्क्यातून फडणवीस अद्याप सावरलेले नाहीत
श्री. फडणवीस तर विखे पाटलांच्या पुढे शंभर पाऊल गेले व हळूच म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाचे काय ? कोणीही इच्छा बाळगू शकतो, पण योग्यता हवी ना?” फडणवीसांनी हे विधान हसत हसत केले असले तरी त्यामागे वैफल्य आणि त्रागा आहे. हा त्रागा सवती मत्सराचा आहे. भर मंडपात ‘वरमाला’, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले, त्या धक्क्यातून ते अद्यापि सावरलेले दिसत नाहीत,” असा टोला सामनातून देवेंद्र फडणवीस यांना लगावण्यात आला.