मुक्ताईनगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी सुरु आहे. यावर पोलिस प्रशासनातर्फे धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गंत मुक्ताईनगर तालुक्यात दोन वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी सुमारे ३५.५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मुक्ताईनगर ते बर्हाणपूरच्या दरम्यान पूर्णा नदीच्या जवळ एमएच २० ईएल ५८४९ आणि एमएच२० १७३७ या क्रमांकांच्या दोन वाहनांमधून वाहतूक करण्यात येणारा प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी मसाला आणि तत्सम सामग्री जप्त केली. या दोन्ही वाहनांमधून वाहनांसह सुमारे ३५ लाख ५२ हजार रूपये मूल्याचा ऐवज जप्त करण्यात आला.
यांच्याविरोधात गुन्हे दाखल
या प्रकरणी वाहन चालक शकील रशीद शेख ( रा. छत्रपती संभाजीनगर ) व क्लीन फैजान इम्रान काचालिया ( रा. छत्रपती संभाजीनगर) तसेच दुसर्या वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख ईस्माईल व क्लीनर शेख फरहान शेख शाहनवाज यांच्यासह जळगाव येथील सुशील रमेश गेही आणि बर्हाणपूर येथील साईनाथ ट्रेडर्सचा संचालक आशीष बुधराणी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिल्या चार संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.