रत्नागिरी : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले होते. ठाकरे गटाकडून रिफायनरी विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक जमले असतानाच खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे ग्रामस्थ मात्र चांगलेच आक्रमक झाले असून जिथे सर्वेक्षण सुरू आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात असतांनाही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना जुगारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडून आंदोलन कर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील करण्यात आला. त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. तणावाची परिस्थिती झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटविले. पोलीस आणि नागरिक यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले.
प्रकल्पास का होतोय विरोध?
खरंतर गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या दरम्यान सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वेक्षण सुरू असल्याने ग्रामस्थानी परवानगी शिवाय हे केलं जात असल्याने त्याला विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन हा विरोध करत आहे.
विनायक राऊत काय म्हणाले ?
बारसू परिसरात अन्य जिल्ह्यातून सुमारे दोन हजारांचा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यां महिलांना पोलिसांनी फरपटत नेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासाठी मागविण्यात आलेले जेवण आणि पिण्याच्या पाण्याचा टँकरही पोलिसांनी सूचना देऊन मिळू दिला नाही. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. महिलांनाही अटक करून रत्नागिरीला नेण्यात आले आणि मानसिक छळ करून रात्री बारा वाजता सोडण्यात आले, असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.