मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील वळपाडा येथील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (29 एप्रिल) दुपारी घडली आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली 50 ते 60 नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत खाली व्यावसायिक वापराचे गाळे व वरती नागरिक राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
अचानक कोसळली इमारत
भिवंडीच्या कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खाली एक गोदाम होते. तर वरच्या दोन मजल्यावर रहिवासी राहत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. त्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 रहिवासी अकडले असल्याची शक्यता आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले असून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.