मुंबई : आजच्या धावपळीच्या काळात आपण अनेक आजारांना सामोरे जात असतो. डोकेदुखी, पित्त, निद्रानाश अशा आजारांना बळी पडतो. यावर उपाय म्हणून मल्टीविटामिन्स, अँटीबायोटिक्स, अँटी-डायबेटिक सारखी औषधे सर्रासपणे वापरली जातात. मात्र या औषधांसंदर्भात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने एक धक्कादायक माहिती दिली आहे. भारतात नियमित वापरली जातात अशी तब्बल 48 औषधं ही गुणवत्ता चाचणीत नापास झाली असल्याचं सीडीएससीओच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपल्या तपासणी अहवालात असं म्हटलंय की, कॅल्शियम, मल्टिव्हिटामिन, अँटिबायोटिक्ससह अशी 48 औषधं आहेत जी गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरली आहेत. गेल्या महिन्यात एकूण 1497 औषधांची गुणवत्ता तपासण्यात आली होती. त्यापैकी 48 औषधे बिनकामी असल्याचं सिद्ध झालं. या तपासणीत असे दिसून आलंय की यापैकी तीन टक्के औषधे मानवी वापरासाठी योग्य नाहीत.
या औषध कंपन्यांचा समावेश
औषधी आणि वैद्यकीय उपकरणं, सौंदर्यप्रसाधने उत्तम दर्जाची नसल्याचे आढळून आले आहे. या गोष्टी मानवी वापरासाठी योग्य नाहीत. ही औषधे बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँड्सची आहेत. CDSCO च्या चाचणी अहवालात उत्तराखंडमध्ये 14, हिमाचल प्रदेशात 13, कर्नाटकातील 4, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी 2-2 आणि गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि पुद्दुचेरीमधील प्रत्येकी एक औषधांचा समावेश आहे. PSU कर्नाटक अँटिबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स, उत्तराखंड-आधारित सिनोकेम फार्मास्युटिकल्स, हरियाणा-आधारित नेस्टर फार्मास्युटिकल्स, उत्तर प्रदेश-आधारित JBJM पॅरेंटरल, सोलन-आधारित रोनाम हेल्थकेअर आणि मुंबई-आधारित ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससह ही औषधं खाजगी आणि सरकारी औषध निर्मात्यांद्वारे उत्पादित केली जातात.
नामांकित टूथपेस्टचाही समावेश
या औषधांमध्ये, Lycopene Mineral Syrup सारखी औषधे देखील आहेत. ज्याचा औषधांचा वापर रोजच्या जीवनात केला जातो. याशिवाय व्हिटॅमिन सी इंजेक्शन, फॉलिक अॅसिड इंजेक्शन, अल्बेंडाझोल, कौशिक डॉक-500, निकोटीनामाइड इंजेक्शन, अमोक्सॅनॉल प्लस आणि अल्सीफ्लॉक्स सारखी औषधे आहेत. ही औषधे जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, ऍलर्जी टाळण्यासाठी, ऍसिड नियंत्रण आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी वापरली जातात. या औषधांमध्ये एका नामांकित कंपनीची टूथपेस्टही निकामी झाली आहे. मोठ्या संख्येने लोक या टूथपेस्टचा वापर केला जात आहे.