पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी या विरोधात धडक मोहिम सुरु केली आहे. पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई केली असून, कोट्यवधीचे ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पुण्यात संगीतकार ए.आर.रहमान यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या कार्यक्रमानिमित्त माफियांनी मोठा प्लॅन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन, अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2 कोटी 21 लाख रूपयांचे एमएम ड्रग्स जप्त केले आहे. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. या कार्यक्रमात युवकांची मोठी गर्दी होणार आहे. या ठिकाणी युवकांना हेरण्यासाठी ड्रग्स माफिया कार्यरत होते. या युवकांना ड्रग्सच्या जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन होता का? याचा तपास पोलीस करत आहे.
मध्य प्रदेशातून आले होते आरोपी
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले कि, मध्य प्रदेशातील रतलाम येथून दोन जण पुण्यात आले होते. त्यांच्याकडून 2 कोटी 21 रुपयांचे 1 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजाद रजमान खान (वय 35, मध्य प्रदेश) नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय 35 मध्य प्रदेश) अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.