जळगाव : वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव आणि नांदगाव परिसरात शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळाच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळी वाऱ्यांचा तडाखा जोरदार असल्याने आणि कोणताही आडोसा बाचावासाठी जवळ नसल्याने या मेंढ्या वादळी वाऱ्यात सापडल्या. हा तडाखा त्या सहन करू न शकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी, मागणी त्यांनी केली आहे.
रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जामनेर तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या आठवड्यापासून धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. आणि जामनेरच्या आजूबाजूच्या असलेल्या खेडेगावांसह तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाने अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांना याचा फटका बसला. जामनेरमधील घरावरची पत्रे उडून गेली. तसेच एका तरुणाच्या अंगावर विद्युत वाहक तारही पडली. विजेचे खांब वाकले. झाडे रस्त्याला कोसळली आणि वाहनांचेही नुकसान झाले आहे.