पुणे : पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यात सायबर चोरट्याने 36 बँकांमधील रक्कम वळती केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील 62 वर्षीय महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जास्त पैशांचे आमिष दाखवत पॉलिसीच्या नादात सायबर चोरटयांनी ही फसवणूक केली आहे. पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी महिलेची तब्बल 55 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यात त्यांच्या विविध 36 बँकांमधील एकूण 55 लाख रुपये गेले आहेत. एप्रिल 2014 ते जून 2020 पर्यंत फसवणुकीचा हा प्रकार सुरु होता. सायबर चोरट्यांनी बनावट कागदपत्रे आणि पॉलिसीची बनावट पावती करुन त्यांची फसवणूक केली आहे.
सहा वर्षांपासून सुरु होता प्रकार
आम्ही बँकेचे कर्मचारी असून, लाईफ पॉलिसी काढून देऊ तसेच त्याचावर मोठा फायदा काढून देऊ, असे आश्वासन या सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेस दिले. त्यानंतर या महिलेने वेळोवेळी विविध 36 बँकांमध्ये रक्कम जमा केली. पैसे भरल्याची बनावट पावती देखील या सायबर चोरट्यांनी त्यांना दिली. हा सगळा प्रकार 2014 ते 2020 पर्यंत सुरू होता. ज्यावेळेस आपल्याला एक ही रुपया मिळत नसून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली.