पुणे : पुण्यातील स्टेशन परिसरातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणून कडक कारवाई केली आहे. या कारवाईत दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून दलालांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दलालांमध्ये रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल यांचा समावेश आहे. तर न्यायालयाच्या आदेशाने तरुणींना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. हे दलाल सोशल मिडीयाव्दारे ग्राहकांच्या संपर्कात होते. फाईव्ह स्टार हॉटेलमधील खोली बुक करून परराज्यातील तरुणींना तिथे बोलावून घेत. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून आर्थिक व्यवहार करत होते.
पोलिसांनी असा रचला सापळा
ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला आणि सापळा लावला. स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये दलालांनी दोन खोल्या आरक्षित करुन ठेवल्या होत्या. या ठिकाणी दोन तरुणींना बोलविण्यात आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. येरवड्यातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.