बालोद : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडींच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 जण ठार झाले असून, एकाच परिवारातील 10 जणांचा समावेश आहे. तर एका दीड वर्षांच्या मुलाचाही यात समावेश आहे. छत्तीसगडमध्ये बालोद येथे ही घटना घडली. बोलेरो कारची ट्रकला धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला.
कांकेर राष्ट्रीय महामार्गावरील जगत्राजवळ हा अपघात झाला. हे कुटुंब लग्नासाठी बोलेरोमध्ये बसून धमतरी येथील सोराम गावातून मरकटोला येथे जात होते. पण मध्येच अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुले आणि 5 महिलांचाही समावेश आहे.
10 जणांचा जागीच मृत्यू
पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व लोक लग्नात सहभागी होण्यासाठी मरकटोला येथे जात होते. ही धडक इतकी जोरदार होती की, 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला दवाखान्यात जाताना जीव गमवावा लागला. त्यांनी सांगितले की, सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अपघातात यांनी गमावले प्राण
अपघातात केशव साहू (वय 34), डोमेश ध्रुव (वय 19), तोमिन साहू (वय 33), संध्या साहू (वय 24), रामा साहू (वय 20), शैलेंद्र साहू (वय 22), लक्ष्मी साहू (वय 45), धर्मराज साहू (वय 55), उषा साहू (वय 55), योगांश साहू (वय 3), इशान साहू दीड वर्ष यांचा मृत्यू झाला आहे.