जळगाव : जळगांव महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपात झालेल्या असमतोलाबाबत पत्र दिले. मात्र स्वतः उपमहापौरांनी निधी वाटपात दुजाभाव केला असून आपल्याच प्रभागात सर्वाधिक निधी दिला असल्याचा आरोप नगरसेवक दिलीप पोकळे यांनी केला आहे. त्यामुळे उपमहापौरांनी नैतिकतेला समोर ठेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पोकळे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले की, मागिल २ वर्षाच्या कालखंडात जळगांव महानगरपालिके अतंर्गत विविध प्रकारचे निधी कुठल्या प्रभागात जास्त प्रमाणात वितरीत व खर्च झाला या बाबत महासभेत महापौर व उपमहापौर यांचे समोर वारंवार प्रश्न विचारले गेले, परंतु अद्यापही त्याचे ठोस उत्तर व माहिती देण्यात आलेली नाही. सर्वात जास्त निधी त्यांचेच प्रभागात त्यांनी पदाचा दुरूपयोग करून खर्च केलेला आहे. जळगांव महानगरपालिके अंतर्गत अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेत प्रभाग क्रमांक १,३,४,१० व १३ आरक्षित आहेत. असे असतांना उपमहापौर कुलभुषण पाटील यांचे प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वात अधिक निधी मागिल २ वर्षात वितरीत व खर्च झाला. प्रत्येक प्रभागासाठी १ कोटी या प्रमाणे ५ प्रभागासाठी ५ कोटीची तरतुद असतांना उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संपुर्ण निधी त्यांच्याच प्रभागात मंजुर केला.
जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार उपमहापौरांना नाही
सदर बाबी विषयी महासभेत चर्चा होवुन झालेल्या प्रकाराला विरोध देखील करण्यात आलेला होता. सर्व सदस्यांनी अशी माननी केलेली होती की, उपमहापौरांनी सदरचा निधी समान पध्दतीने वाटप करावा परंतु तशी नैतिकता त्यांनी दाखविली नाही. मग आज रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार उपमहापौर यांना आहे का? महासभा, विशेष बैठका यांचे इतिवृत्त पाहिले तर लक्षात येईल की कुलभुषण पाटील यांनी संपुर्ण शहाराचे उपमहापौर असतांना देखील फक्त त्यांच्याच प्रभागाचा विचार व विषय केलेला आहे. संपुर्ण शहराचा विचार करण्याची त्यांची जबाबदारी असतांना देखील त्यांनी संकुचीत बुध्दीने त्यांचाच प्रभागाचा विचार केलेला दिसतो.
आजपर्यंत वितरीत झालेला निधी पुढील प्रमाणे
सन २०१९-२० प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४ कोटी रूपये, सन २०१९-२० प्रभाग क्रमांक १३ मध्ये ५ कोटी २५ लाख रूपये, सन २०२० – २१ प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ कोटी १९ लाख रूपये, सन २०२१-२२ प्रभाग क्रमांक १० मध्ये २ कोटी ८९ लाख रूपये, सन २०२१-२२ प्रभाग क्रमांक १० मध्ये १ कोटी ४९ लाख रूपये, सन २०२१-२२ प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ कोटी ९ लाख रूपये.