पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये उच्च पदावर कार्यरत शास्त्रज्ञ पाकिस्तानच्या जाळ्यात अडकला. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप या शास्त्रज्ञावर आहे. तपासात त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तकाशी संपर्क साधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रदीप कुरूलकर, असे अटक करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुरूलकर याने अनेक क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले आहे. तो पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाच्या संपर्कात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच्याविरुद्ध मुंबई येथील काळा चौकी पोलीस ठाण्यात अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून पुणे न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून एटीएसने त्याची कोठडी मिळवली.
उच्च पदावर काम आणि पुरस्कार
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी सहा वर्षे भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्यांसोबत काम केले. 1998 मध्ये झालेल्या अणूचाचणी दरम्यान जे 35 वैज्ञानिक होते, त्यात कुरुलकर यांचा समावेश होता. त्यांना 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी विज्ञान दिन पुरस्कार मिळाला होता. 2002 मध्ये आत्मनिर्भरतेमध्ये उत्कृष्ठतेसाठी डीआरडीओ अग्नी पुरस्कार, 2008 मध्ये आकाशसाठी पथ ब्रेकिंग संशोधन पुरस्कार, उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओचा पुरस्कार मिळाला होता.