जळगाव : भाजपने आगामी जि.प. पंचायत समिती, महापालिका निवडणुकांचा काळ पाहता प्रदेशाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. तसेच लवकरच आता जिल्हानिहाय कार्यकारिणीदेखील महिन्याअखेरपर्यंत जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, भाजपने ‘एक व्यक्ती, एक पद’ हे सूत्र संघटनेत आणले असल्याने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना जिल्हाध्यक्षपदावर आपला दावा करता येणार नाही. या निर्णयामुळे मात्र जे पक्ष संघटनेतील इतर आहेत, मात्र, संघटनेव्यतिरिक्त ज्यांच्याकडे लोकप्रतिनिधीपद नाही, अशा पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष पदांवर पक्षाकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता भाजपच्या इच्छूक उमेदवारांनी मोठ्या नेत्यांसह संघपरिवारातील मंडळींच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. गेल्याच महिन्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता, पक्षसंघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांची माहिती घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत भाजपला नवीन जिल्हाध्यक्षांसह नवीन महानगराध्यक्ष देखील मिळण्याची शक्यता आहे.
या दिग्गजांना संधी नाही
भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, ‘एक व्यक्ती, एक पद’ या सुत्रामुळे आता दोन्ही पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. तसेच आता जिल्हाध्यक्षपद नगरसेवक, जि. प. सदस्याकडे राहील की नाही याबाबत अजून निश्चिती नाही. मात्र, इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पी. सी. पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अमोल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नंदकुमार महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. जळगाव महानगराध्यक्षपदासाठी डॉ. अश्विन सोनवणे, अरविंद देशमुख यांच्या नावांची चर्चा असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपचा पॅटर्न बदलणार..?
भाजपकडून नेहमी जळगाव शहर व जळगाव जिल्हा ग्रामीण असे दोन जिल्हाध्यक्ष देण्यात येतात. मात्र, आता जिल्हाध्यक्ष पदाचा पॅटर्न भाजपकडून बदलण्यात येणार आहे. शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटाने जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी चार जिल्हाध्यक्ष दिले आहेत. आता भाजपकडून देखील हा पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता असून, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष देण्यात येणार आहेत तर शहर जिल्हाध्यक्ष वेगळा राहील. त्यामुळे भाजपचे देखील तीन जिल्हाध्यक्ष आता जिल्ह्यात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.