मुंबई – महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच महाड इथं उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्यात सभेत काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना सांगूनही त्यांनी ऐकलं नाही असं म्हणत पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.
नाना पटोले म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते आपण असं करू नका, परंतु त्यांनी ते केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षालाच कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीची बैठक होईल तेव्हा याविषयावर चर्चा करू. महाडची ती जागा काँग्रेस पक्षच लढवेल असंही पटोलेंनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत स्नेहल जगताप?
स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्यांनी महाडचे नगराध्यक्षपदही सांभाळले आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर नुकत्याच महाड येथील ठाकरेंच्या सभेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. इतकेच नाही तर स्नेहल जगताप यांच्यासोबत काँग्रेसचे हनुमंत जगताप, संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ यांनीही ठाकरे गटात प्रवेश घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला.
महाडची जबाबदारी
सध्या महाड येथे आमदार भरत गोगावले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पूर्वी ठाकरेंसोबत असलेल्या भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांना पाठिंबा देत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाची ताकद कमकुवत झाली आहे. अशावेळी स्नेहल जगात यांना पक्षात घेत उद्धव ठाकरेंनी गोगावलेंविरोधात रणनीती आखत स्नेहल जगतापांना मविआकडून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यात आता नाना पटोलेंनीही त्याठिकाणी काँग्रेस जागा लढवेल असं सांगितल्याने महाडच्या जागेवर २ पक्षांनी दावा केला आहे.