अमळनेर : हळद समारंभ सुरू असताना काही संशयितांना महिला व मुली नाचत असतानाचा व्हिडिओ बनवला व त्यावरून दुसर्या गटातील तरुणाने जाब विचारल्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली तर एकाने हातात तलवार काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार शहरातील गांधलीपूरा भागात घडला. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर संशयित पसार झाले. पोलिसांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील संशयितांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागातील अमोल अशोक खैरनार यांच्याकडे लग्नाचा कार्यक्रम होता. लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली नाचत होत्या. त्यावेळी संशयित अमन हारून बागवान, शाबीर फिरोज पिंजारी यांच्यासह इतर 2 ते 3 जणांनी महिला नाचनांचा व्हिडीओ केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राहुल रमेश भोई व गौरव तुकाराम मिस्तरी यांनी संबंधिताना हटकल्याने शाब्दीक वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
या संशयिताविरोधात गुन्हा
अमर बागवान, शबीर पिंजारी यांच्यासह दुसर्या गटातील राहूल रमेश भोई, गौरव तुकाराम मिस्तरीसोबतच्या तिघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली व राहुल भोई याने हातात तलवार घेवून दहशत माजविली. हा प्रकार घडल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी धाव घेतली मात्र संशयित घटनास्थळाहून पसार झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.