मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापले आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा दावा केला जात आहे, असे असताना शिवसेना शिंदे गटाच्या मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही लोकं, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकं आणि काँग्रेसमधीलही काही लोकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय, असा गौप्यस्फोटच शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 172 पेक्षा जास्त म्हणजेच मेजॉरिटीचा विषयच नाही, असेही सामंत म्हणाले. सत्तासंघर्षाच्या बाबतीत यापूर्वीही अनेकदा आम्ही सांगितलंय, आमची योग्य बाजू आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर, सर्वोच्च न्यायालयातील निर्णय देईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
त्या 16 आमदारांचे काय होणार?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 16 मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली. शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या किंवा परवा म्हणजेच 11 मे किंवा 12 मे रोजी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.