यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात शेतात पाणी देत असतांना अचानक विजेची तार तुटल्याने ५७ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंजाळे येथील वासुदेव मार्तंड चौधरी (वय-५७) हे सकाळी आपल्या गाव शिवारातील असलेल्या त्यांच्या शेत गट क्रमांक- ५५२ मध्ये केळीच्या बागेत पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी मोटार सुरू केली व शेतात मध्ये गेले असता या ठीकाणी इलेक्ट्रिक खांबावरील तुटलेल्या तारेला धक्का लागल्याने जागीच मरण पावले.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली
मयत वासुदेव चौधरी यांच्या पत्नी यांनी वारंवार संपर्क केले. मात्र उतर न मिळाल्याने तसेच, चौधरी हे उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील ग्रामस्थांनी शेतात जाऊन तपास केला. तेव्हा, वासुदेव चौधरी हे मृत अवस्थेत मिळुन आले. सदर घटना अंजाळे गावात माहिती पडताच परिसरात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची खबर त्यांचा पुतण्या सचिन पुंडलिक चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे. मयत वासुदेव चौधरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, सून, पुतणे व नातेवाईक असा परिवार आहे.