मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला धुळ चारुन दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यानंतर आज मविआच्या नेत्यांची महत्वपुर्ण बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, भाजपचा कर्नाटकमध्ये मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली. या निकालानंतर त्यापुढील वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. उन्हाळा कमी झाल्यानंतर पाऊसमान पाहून सभा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मविआची वज्रमूठ सभा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
विधानसभा-लोकसभा एकत्रितपणे लढवणार
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे नेते चर्चा करणार आहेत अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. कर्नाटक प्रमाणे मविआला महाराष्ट्रात यश मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजप विरोधात रोष होता तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे. कर्नाटकमधील जनतेने मोदी-शाह यांच्यावरचा राग काढला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. पुढील सभा पुण्यात होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्यातील सभेत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.